मनकथा - Connection
POV 1 - Bluetooth disconnected. हिवाळ्यातली शनिवार सकाळ. सकाळचे सात वाजले असतील. तो हातात कॉफीचा मग घेऊन 25 व्या मजल्यावरच्या आपल्या बाल्कनीतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर पसरलेल्या धुक्याकडे निर्विकारपणे पाहत होता. "धुकं नाही. धुरक." तो स्वतःशीच बोलत होता. "सगळं कसं प्रदूषित. या जंगलाचा रंगही अगदीच उदासवाणा. मग शहराची गोष्टच सोडा. हा सूर्य पण उगवतोच आहे.नुसताच, उगाचच. लोकांना त्याचा ताप होतोय हे कळतच नाही त्याला. नशीब! मला ते कळलं आणि सोडली नोकरी. आज सुटकेचा पहिला दिवस." त्याने उसासा सोडला. त्याची विचाराची तंद्री तुटली आणि त्याचं लक्ष थंड झालेल्या कॉफीकडे गेले. "अगदी माझ्या आयुष्यासारखी, थंड." स्वतःशीच कुत्सितपणे हसत म्हणाला आणि वळून घरात डोकावला. घर तसं निपचितच पडलं होतं. बाहेरच्या झाडांच्या हिडीस सावल्या अचकट विचकट दात दाखवत त्याच्यावर हसत आहेत, असं वाटलं त्याला. काय करावं सुचेना. टीव्ही नव्हता, पुस्तकं नव्हती. होत्या त्या, पांढऱ्याफट...