सृजनशील विस्मृती
ऑनलाइन काहीसं शोधत असताना शैलप्रिया नावाच्या एका कवयित्रीची 'विस्मृती' नावाची कविता माझ्या वाचनात आली. कविता छान होती तरी कवितेच्या शीर्षकाने माझे लक्ष अधिक वेधलं आणि मी लेखणी हातात घेतली. विस्मृती... चांगली की वाईट? या प्रश्नाचं एक सरळ साधं उत्तर म्हणजे, दुःखद गोष्टींची विस्मृती चांगली आणि सुखद गोष्टींची वाईट. पण हे इतकं साधं सरळ नाही बरंका! अर्थात इथे मी मानसिक स्तरावरच्या स्मृतीविषयी बोलतो आहे. बाकी, आपल्या दैनंदिन जगण्याकरता गरजेच्या सवयी, कौशल्य, ठिकाण, माणसे आणि त्यांच्याशी असलेले नाते या सर्वांची स्मृती आवश्यकच आहे आणि हे तिचे कार्य अगदी विनासायास, ताणरहितपणे सुरूच असते. मी बोलतो आहे ते भावनिक स्मृतींविषयी.
स्मृ या धातूपासून स्मृती या शब्दाची उत्पत्ती झाली खरी. पण, मला मात्र मृत या संस्कृत शब्दातून/धातूतूनच स्मृती या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असे वाटते. जे घडून गेले आहे, जे आत्ता अस्तित्वात नाही त्या गोष्टींचा, आपल्या अनुभवाने, संस्काराने तयार केलेल्या प्रतिमांचा संग्रह म्हणजे स्मृती. थोडक्यात, जे जे मृत आहे त्याचा आभास आपल्या मेंदूमध्ये जिवंत ठेवण्याचा अट्टाहास म्हणजे स्मृती. या स्मृतीची मजा अशी आहे की, ती सुखद असो वा दुःखद आपल्याला सोडावीशीच वाटत नाही. दुःखद स्मृतिना एकांतात उराशी कवटाळून कुढण्यात, तर कधी लोकांसमोर त्यांचं प्रदर्शन मांडण्यात आपल्याला एक विचित्र सुख मिळतं. कधी कधी तर अशा प्रकारच्या दुःखद स्मृती सूड, द्वेष, भेदभाव अशा विवेकशून्य, असामाजिक वृत्तींना खतपाणी घालण्याचे काम करतात. याउलट सुखद स्मृतिचं. आपल्याकडे जे होतं, ते आता नाही या न्यूनतेची अतिशययोक्तीपूर्ण जाणीव करून देत त्या एकतर उदास तरी करतात, नाहीतर पूर्वी कधी काळी केलेल्या एखाद्याच महत्त्वपूर्ण पण आता उपयोगशून्य असलेल्या गोष्टीने आपल्या मीपणाला दृढतर करीत वर्तमानात आपल्याला किंकर्तव्यमूढ करतात. काय गंमत आहे ना? दुःखद गोष्टी विकृत आनंद देतात आणि सुखद गोष्टी उदासीन करतात. अर्थात याला काही अपवाद असतीलही. पण, अपवादांना आपण नियम मानू शकत नाही.
विस्मृती मला या सर्व गुंतागुंतीवरचा अतिशय उत्तम असा रामबाण उपाय वाटतो. परवाच ड्रीम इलेव्हन ची जाहिरात माझ्या पाहण्यात आली. त्यात कोहली पत्रकाराला म्हणतो, "भूलना पडता है. फिर से चॅम्पियन बनने के लिए, हमे ये भूलना पडेगा की, हम चॅम्पियन थे." विस्मृतीचे महत्व सांगणारे इतकं साधं, सोपं आणि अप्रतिम उदाहरण अजून काय असू शकेल. थोडक्यात, सत्याचा म्हणजे वर्तमानाचा उपभोग घ्यायचा असेल तर असत्याचा अर्थात भूत आणि भविष्याचा त्याग आवश्यकच आहे. विस्मृती म्हणजे एक प्रकारचे विसर्जनच नाही का? कुठल्याही नव्या सृजनासाठी जुन्या प्रतिमांचे, मग त्या प्रतिमा कितीही सुंदर असोत, विसर्जन करावेच लागते. जसं शिशिराआधी वसंताचे अल्हाददायक आगमन होऊच शकत नाही. स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आस्वाद घेण्यासाठी जसं आकाश हे निरभ्रच हवं. तसं अगदी तसंच असतं विस्मृतीच.
विस्मृती म्हणजे शून्यत्व. पण, शून्यता म्हणजे रिक्तपणा नव्हे. शून्यातूनच विश्वाची निर्मिती झाली हे सर्वश्रुत आहेच. म्हणून संस्कृतात शून्याला पूर्ण म्हणत असावेत. आणि जे पूर्ण नाही ते सगळं अपूर्णच नाही का?
म्हणून, जर खरी मुक्तता व सर्जनशीलता अनुभवायची असेल तर, सगळ्या सुखद-दुःखद आठवणींची, कर्तुत्वाची, यशापयशाची, पूर्वग्रहांची, संस्कारांची, पूर्ण विस्मृती होणे गरजेचे आहे. ही विस्मृतीच खऱ्या अर्थाने सृजनशीलता आहे. काय पटतय का?
- सागर रानडे

टिप्पण्या
Milind M