मनकथा - Connection
POV 1 - Bluetooth disconnected.
घर तसं निपचितच पडलं होतं. बाहेरच्या झाडांच्या हिडीस सावल्या अचकट विचकट दात दाखवत त्याच्यावर हसत आहेत, असं वाटलं त्याला. काय करावं सुचेना. टीव्ही नव्हता, पुस्तकं नव्हती. होत्या त्या, पांढऱ्याफटक भिंती. सोशल मीडिया त्याने कधीच सोडला होता आणि लोकांकडे येणं जाणंही. सोशल मीडियावरचे फोटोज, इनस्टास्टोरीज, स्टेटस पाहून त्याला आपल्यातल्या पोकळीची जाणीव होई. लोकांना, त्यांच्या घरच्यांना भेटल्यावर त्याचा एकटेपणा अधिकच गडद होईल आणि मग... तो उठला. ती थंड कॉफी कशीबशी गळ्याखाली उतरवली आणि दुपारच्या जेवणाची सोय करण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळला. ओट्यावर पाहतो तर, आठवड्याभरापूर्वी आणून ठेवलेली भाजी तो फ्रीजमध्ये ठेवायला विसरला होता. स्वयंपाकघर त्या कुबटवासाने भरून गेले होते. वैतागून तो काल रात्री मागवलेल्या पिझ्झाचा एक तुकडा फ्रिज मधून काढू लागला, तेव्हा त्याला फ्रिजमध्ये लाल भडक सफरचंद आणि काळीकभिन्न द्राक्षे दिसली. जमा झालेल्या चिकट रक्ताच्या थारोळ्याचं आणि गडद काळ्या अमावास्येच्या रात्रीचं ते प्रतिनिधित्व करतायेत असं त्याला वाटलं. त्याने रागानेच फ्रीजचा दरवाजा आपटला आणि तो थंडगार पिझ्झाचा तुकडा गरम न करता चिवडत आणि चघळत खुर्चीत जाऊन बसला. तो कितीतरी वेळ विचार करत होता. विचार करता करता त्याला कधी झोप लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही.
संध्याकाळ दाटून आली. बाहेरच्या लांबुडक्या सावल्या त्याच्या चेहऱ्यावर पडल्या. तो अचानक दचकून जागा झाला. काहीतरी भयाण सरसरून गेलं त्याच्या स्वप्नातून, डोळ्यातून आणि मेंदूतून. त्याला अगदीच विषण्ण वाटू लागलं. "आता सोमवारपासून ऑफिसला जायचं नाही. मग? मग.. काय करायचं? इथे लोक आपल्या भूतकाळातून भविष्याकडे वर्तमानाच्या वाहनातून मुशाफिरी करतात आणि मी? काळाने माझा नुसताच भूतकाळ, भविष्यकाळ नव्हे.. तर वर्तमानही खाऊन टाकला आहे. माझा वर्तमान, पिझ्झाच्या थंडगार तुकड्यासारखा." तो अतिशय बेचैन, भयचकीत होऊन इथे तिथे पाहत होता. त्याने अचानक काहीतरी मनाशी ठरवलं आणि झटकन निघाला संजय गांधी उद्यानाच्या दिशेने.
बाहेरचा ठार बहिरा करणारा कल्लोळ असह्य होऊन त्याने इयरबडस कानात घातले आणि मोबाईल वरती गाणी लावली. तो कितीवेळ चालत होता, ते त्याचं त्यालाच कळलं नाही. त्याने गाणी बंद केली आणि समोर पाहिलं तर...आजूबाजूला अंधार आणि जंगल दाटून आलं होतं. ती अमावस्येची भयाण रात्र होती, तरी आपण डोंगराच्या कड्यावर पोहोचलो आहोत, हे त्याला जाणवलं. इथून समोर पसरलेलं भेसुर शहर दिसत होतं. अचानक भीतीची थंड शिरशिरी, त्याच्या मणक्यातून सळसळत गेली. त्याने पुन्हा मोबाईल वरती गाणं प्ले केलं. 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?' हे शब्द त्याच्या कानात गुणगुणले. डोक्यात घणघणले. खरंच असं एकटं जगण्यात काय अर्थ आहे. त्याला तो एकटा असल्याची असह्य जाणीव झाली. एक भेसुर भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला आणि क्षणात त्याचा देह हवेत फडफडला आणि दुसऱ्या क्षणी तो छिन्नविछिन्न होऊन दरीत पडला होता. त्याच्या त्या निष्प्राण कानामध्ये त्याचे इअरबड चमकत होते. ते विझत कुजबूजले .. 'Low battery. Bluetooth disconnected' आणि अंधाराने जंगलासोबत त्यालाही पोटात घेतलं.
POV 2 - Bluetooth connected.
हिवाळ्यातली शनिवार सकाळ. सकाळचे सात वाजले असतील. तो हातात कॉफीचा मग घेऊन 25 व्या मजल्यावरच्या आपल्या बाल्कनीतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर पसरलेल्या धुक्याकडे प्रसन्नतेने पाहत होता. "धुकं नाही. दुधावरची साय." तो स्वतःलाच म्हणाला. "सगळं किती आल्हाददायक आहे. हे जंगलही विविध रंगांच्या छटांनी बहरले आहे. हा सूर्य रोज न चुकता माझ्यासाठी, आमच्यासाठी निस्वार्थपणे उगवतो आहे. मला पण असंच जगायचे आहे. निस्वार्थ.. दुसऱ्यासाठी. नशीब हे उमगलं आणि सोडली नोकरी. आज खरी जबाबदारी पेलण्याचा पहिला दिवस." त्याने भरभरून श्वास घेतला. त्याची विचाराची तंद्री तुटली आणि त्याचं लक्ष थंड झालेल्या कॉफीकडे गेले. "अगदी माझ्या मनासारखी, शांत. पण आता, त्याला विचारांची उकळी द्यायला हवी." प्रसन्नतेने हसत तो कॉफी ओव्हनमध्ये गरम करण्यासाठी घरात डोकावला.
घर त्याच्या मनासारखंच स्वच्छ आणि प्रसन्न दिसत होतं. बाहेरच्या झाडांच्या सावल्या घरभर नृत्य करत आहेत, असंच त्याला वाटलं. घराच्या पांढऱ्याशुभ्र भिंती त्याला खुणावून सांगत होत्या, 'हे तुझं भविष्य आहे. तुला हवं ते कर. रंग भर, चित्र काढ, निसर्ग चित्र लाव. it's all yours.' त्याने सोशल मीडिया कधीच सोडला होता. त्यावरचे फोटोज, इन्स्टास्टोरीज, स्टेटस यातून त्याला त्या सर्व लोकांच्या मुखवट्यामागचं दुःख, वेदना दिसत होती. हं! पण त्याने पुस्तकांशी आणि लोकांची नातं तोडलं नव्हतं. कारण, त्यांच्या सहवासात त्याचं मन प्रेमाने भरून येई. तो गरम कॉफीचा घोट घेत कवितेच्या ओळी गुणगुणू लागला.
'देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने घेत जावे.
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.'
दुपारी जेवणात काय करायचं? याचा विचार करत तो स्वयंपाक घरात घुसला तर, एक कुबट वास तिथे भरला होता. आठवड्यापूर्वी आणून ठेवलेली भाजी तो फ्रीजमध्ये ठेवायला विसरला होता. स्वतःच्या विसर भोळेपणावरती हसत तो तडक साफसफाईच्याच कामाला लागला. अवघ्या काही मिनिटातच त्याने स्वयंपाकघर चकाचक करून देवापुढे दिवा लावला. केवड्याच्या अगरबत्तीचा सुवास सर्वत्र दरवळू लागला. स्वयंपाकघराने कुबटपणा टाकून देऊन मस्त सुगंधी मोकळा श्वास घेतला. आता त्याला भूक लागली म्हणून त्याने फ्रीज उघडून पाहिलं, तर त्याला त्यात ताजी सफरचंदे व काळी द्राक्षे दिसली. धमन्यात उसळणाऱ्या गरम रक्ताचं आणि काळ्याभोर शांत तलावाचं जणू प्रतिनिधित्व ते करत आहेत असं त्याला वाटलं. स्वतःच्याच कल्पनाविलासावर हसत फलाहार फस्त करून तो खुर्चीत बसला. तो कितीतरी वेळ विचार करत होता. विचार करता करता त्याला कधी झोप लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही.
संध्याकाळ चोर पावलाने हळूच घरात शिरली. सायंकाळच्या सोनसावल्या त्याच्या शांत, हसऱ्या चेहऱ्यावर पडल्या. तो दचकून जागा झाला. काहीतरी अलौकिक त्याच्या स्वप्नातून त्याच्या मनाला गुदगुल्या करून गेलं. काहीतरी ध्येय सापडल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. "आता सोमवारपासून ऑफिसला जायचं नाही. पण, पुढचं काम करायला आठवड्याचे सात दिवसही कमी पडतील. आता भविष्याचा विचार सोडून वर्तमानात जगायचं. एक सुरेख भूतकाळ घडवायचा." त्याच्यातला उत्साह त्याला स्थिर बसू देत नव्हता. त्याने अचानक काहीतरी मनाशी ठरवलं आणि झटकन निघाला संजय गांधी उद्यानाच्या दिशेने.
बाहेरचा कल्लोळ त्याच्या शांत प्रसन्न मनाला जाणवलाच नाही. तो किती वेळ चालत होता, ते त्यालाच कळलं नाही. तंद्री तुटून त्याने समोर पाहिलं तर आजूबाजूचा अंधार आणि जंगल त्याला आपल्या कवेत घेत होतं. त्या निरव शांततेत एक उत्साहित करणारा सुवास दरवळत होता. जंगल किलबिलत होते. अमावास्येची रात्र असूनही त्याला समजलं, की तो कड्याच्या टोकाला येऊन पोहोचला आहे. अमावस्या असली तरी आकाशातील चांदण्यांची पखरण त्याला भुलवत होती. समोर अजस्त्र पसरलेलं शहर होतं, त्याच्याकडे पाठ करून तो मागे वळला, जंगलाच्या दिशेने. जंगलातल्या त्या खोलदरीत, अंधारात आदिवासींच्या वस्तीतले दिवे लुकलुकत होते. आता पुढचं आयुष्य आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील या विस्थापित बांधवांसाठी करायचा, हे ठरवूनच तो निघाला होता. आता त्या दिव्यांच्या रोखाने मजल दरमजल करत, अंधार तुडवत त्याला निघायचं होतं. त्याने इयर बड कानात घातले आणि गाणं सुरू केलं. इयर बड कुजबूजले. "Bluetooth connected. " आणि गुणगुणू लागले 'मे जिंदगी का साथ निभाता चला गया.' आणि तो आपला मार्ग आक्रमू लागला. चोहोबाजूंनी अंधार दाटून येत होता. पण, तरीही तो ब्लूटूथचा लहानगा निळसर प्रकाश आणि आदिवासी पाड्यातले मिणमिणते दिवे, आकाशातल्या ताऱ्यांच्या साक्षीने, अंधाराच्या छाताडावर पाय रोवून खंबीरपणे उभे होते.
- सागर रानडे
POV - Point of View, दृष्टीकोन.

टिप्पण्या
दोन भिन्न व्यक्तिरेखांचे मनोचित्र अतिशय तरलपणे मांडले आहेत..
धन्यवाद
As usual apratim❤️
दृष्टिकोन बदलायला लावणारी स्टोरी आहे.
शेवटी एवढंच म्हणेन लेख connected to heart..✨❤️💐
- Sham Raut
सध्याच्या धावपळीच्या आणि ऐच्छिक सुखाच्या मागे धावता धावता आपण दुसऱ्या प्रकारचं जगणं विसरून गेलो आहोत. फक्त धावत आहोत. अश्यांना ह्या कथेतून काही फायदा होईलच.