हृदय कथा: पराधीन आहे जगती


3 ऑक्टोबर 2025 - माझ्या जीवनातला अविस्मरणीय दिवस. आयुष्यातल्या जीवनाचं महत्त्व मनावर ठसवणारा दिवस.  मला सौम्य (?)  हृदयविकाराचा झटका आला आणि माझे स्वतःबद्दलचे सगळे अहंगंडाचे, चिरंजीवत्त्वाचे, स्वप्नांचे भ्रम एका झटक्यात धुळीला मिळवून खाडकन मला वास्तवाच्या दुनियेत घेऊन आला. 


पहाटे तीन ते दुपारी साडेबारापर्यंतचा काळ हा असा काळ होता जेव्हा मी माझ्या 46 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा वर्तमानात जगत होतो.  एक  एक गोष्ट  टिपत होतो.  एक एक एक हृदयाचा ठोका अनुभवत होतो.  तरुण पोरांना आव्हान  देत, दुनिया हिला देंगे हम च्या थाटात तीन चार तास बेधुंद होऊन नाचू शकणार मी, I.C.U. मधल्या बिछान्यावर पापणी हलवली तरी हृदयाचा ठोका बंद पडेल या विचाराने अगदी निश्चल पडून होतो. स्वतःला घराचा पोशिंदा समजणारा मी, रंगमंचावर विविध व्यक्तीरेखांसाठी आपल्या शारीरिक अंगांचा अगदी सहजगत्या ताबा घेऊ शकणारा नट (?), बऱ्यापैकी मॅरेथॉन धावू शकणारा मी, स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार समजणारा मी, कर्तुत्ववान मी, आज हगण्या-मुतण्यासाठी इस्पितळातील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आणि आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक श्वासासाठी तिथल्या डॉक्टर्सवर पूर्णपणे विसंबलेलो होतो.


I.C.U. मध्ये वेदनेच्या अनेक कहाण्या माझ्या आसपास पहुडलेल्या होत्या. ऐंशी वर्षाच्या वृद्ध कादंबरी पासून तिशीतल्या लघुकथेपर्यंत, वेगवेगळ्या आयुष्यांच्या पुस्तकांची पाने फडफडत होती. जरी पुस्तके वेगवेगळी होती तरी, त्यातील वेदनीची कहाणी मात्र एकच होती आणि ती मला  तीव्रतेने जाणवत होती.आणि ती म्हणजे आपली कहाणी अर्धवटच राहणार असल्याची तीव्र जाणीव. अभी तो बहुत कुछ करना बाकी था. सगळ्यांच्या मनात एकच टेप वाजत असावी असं वाटलं….'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक  कहाणी.’  आणि मला अचानक जॉन लेनांचा quote  आठवला. Life is what happens to you while you are busy making other plans. मन हळवं झालं. डोळे ओलसर आणि घसा कोरडा.

इतक्यात मला आवाज ऐकू आला. ‘’चला! 410 ला एनजीओग्राफीसाठी ऑपरेशन थेटरला घेऊन चला.” नाटकाच्या बोर्डावर ‘...आणि सागर रानडे’ हे नाव असल्याची स्वप्न पाहणाऱ्या मला अचानक एक तीव्र जाणीव झाली आणि ती जाणीव सबंध शरीरातून फिरली.  मी मी करणारे आपण…आपण फक्त एक नंबर आहोत.  अजाणतेपणी एक उदास हास्य माझ्या ओठांवर उमटलं. डोळे क्षणात मिटले गेले आणि मनात एक गाणं घुमू लागलं. ‘दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा… पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’


  • सागर रानडे

टिप्पण्या

Dr.Sanjay K Latkar म्हणाले…
Change is the law of life. Be happy and enjoy every moment of life. all the best
Sanghshree Gaikwad म्हणाले…
डॉक्टरांसाठी आपण रुग्ण आहोत.
आजार प्रत्येक जिवाचा भाग आहे.

आज असो किंवा नसो सागर रानडे एक विचार आहे.
एक हाडा मासाचा एक माणूस ज्याने बर्‍याच लोकांच्या हृदयाला स्पर्श केला.
जिवन जरी क्षणिक असला तरी, तुमचे कर्म उरतील तुमच्या मागे तुमची कथा सांगायला.
तुमचा काव्य राहील.
बेफिकीर जिवन राहील.

तुम्ही प्रकृतीला कारण ठेऊन तुमची प्रवृत्ती नका बदलू तुमच्या बेफिकीर वागण्याची गरज आहे.
तुमच्या कलेच्या मार्गाने ती अभिव्यक्त होणार आहे.

सागर कधी दिशा भेटेल तसा कधी वाहताना कधी पाहिलात? नाही.

तुम्ही सागर आहात, पसरा.
निनावी म्हणाले…
जिगरी मित्रा, तुझ्या धीट पणाला सलाम, हे आजकाल नॉर्मल आहे, रंगमंचावर कधी भेटू बोल
Saby म्हणाले…
काळजी घे, ठणठणीत हो!
आमच्या सदिच्छा सोबत आहेतच.
Vaishali Kanade म्हणाले…
"मी मी करणारे आपण... आपण फक्त एक नंबर आहोत" — ही ओळ एखाद्या गीतेसारखी हृदयात रेंगाळते. या क्षणी अहंकार, यश, कर्तृत्व या सगळ्यांचा चकाकीचा थर कसा झटक्यात निघून जातो आणि “श्वास” ही सर्वात मोठी देणगी वाटू लागते, हे तुम्ही अत्यंत प्रभावीपणे जाणवू दिलं आहे.

थोडक्यात म्हणायचं तर:
ही केवळ “हृदयविकाराच्या झटक्याची कहाणी” नाही, तर अहंकाराच्या मृत्यूनंतर पुनर्जन्म घेणाऱ्या माणसाची कहाणी आहे.
तुमच्या शब्दांत प्रांजळता, वेदना आणि कृतज्ञतेचं अद्भुत संतुलन आहे.

काळजी घ्या
Sanjeev Bhamre म्हणाले…
You are a fighter Sagar. I am sure you will emerge stronger through this !
निनावी म्हणाले…
आयुष्याची मोठी लढाई तू जिंकलेली आहेस, यापुढे तू अधिक प्रबळ आणि प्रभावशाली असशील, यापुढे कोणतीही संकट तुझ्याकडे येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤️❤️❤️
निनावी म्हणाले…
लवकर बरा हो ❤️
अजय गाडे म्हणाले…
माझ्याही हृदयाची सर्व्हिसिंग करून घेईन म्हणतोय.☺️ सागर दीर्घायु व्हा
अथांग म्हणाले…
Love you shree. तुही तेवढाच श्रीमंत आहेस. विचार कळायला पण विचारी माणूस लागतोच.
अथांग म्हणाले…
Thanks मित्रा. नक्कीच
अथांग म्हणाले…
धन्यवाद. होईनच तुमच्या प्रेमाने.
अथांग म्हणाले…
धन्यवाद वैशाली. तुमचं कौतुक इतकं आहे की माझी तेवढी पात्रता नाही.
अथांग म्हणाले…
धन्यवाद वैशाली. तुमचं कौतुक इतकं आहे की माझी तेवढी पात्रता नाही.
अथांग म्हणाले…
हाहाहा. सर. तुम्ही एक अवलिया आहात. तुमच्या शुभेच्छा असल्यावर अजून काय हवा.
Sham Raut म्हणाले…
Sagar sir, hope all is well now..✨💐
tumche lekh adun madun jasa vel asel tasa vachat asto.. an ajchaya lekhatali khali dileli oal vachun shanbhar life pasue jhali..,
"मी मी करणारे आपण…आपण फक्त एक नंबर आहोत..."

hi vel kunavar hi na yevo hich deva kde prathnaa.. baki tumhi bahu ayami ahat, ani ek kalakar ha pratek veles aaplya kalela sadar kas krta yeil haychi sandhi shodhat asto ani tich gosht tya kalakarala ek saccha kalakar bnvte as mala tari vatat.., mhnuch tumhi hya prasagat hi modun n jata punha navin jomane sruvat krtana, tya n vyakta krta yenarya anubhavana aamchya smor madun apmhala hi ek reality check dilat tya badal hi khup abhaar..
lavkrch bhetu Sagar sir...✨💐❤️
चार्ल्स थॉमस गोम्स म्हणाले…
खरंतर ३ ऑक्टोबरचा दिवस मीही कधीच विसरू शकत नाही सागर. कारण त्या दिवशी मी तुला मृत्यूच्या अगदी दाराशी उभं राहिलेलं अनुभवलं होतं. आणि तरीही, आयसीयूच्या बाहेर जेव्हा तुला भेटलो, तेव्हा तुझ्या डोळ्यांत पुन्हा नव्यानं जगण्याची जिद्द पाहिली होती.

मला अजूनही आठवतंय, पहाटे साडेतीनच्या सुमारास प्राचीचा फोन आला होता. नेहमीप्रमाणे मी तिच्याशी बोललोही असतो, पण त्या रात्री असं काही घडलं होतं, जे माझ्या आयुष्यात कधी झालं नव्हतं. साधारणपणे माझा फोन कधीच बंद पडत नाही, पण त्या दिवशी का कुणास ठाऊक बॅटरी अशी संपली, की जणू नशिबालाच ते ठरवायचं होतं. प्राचीचा तो कॉल मी उचलू शकलो नाही, आणि त्या काही सेकंदांचा तो न बोललेला संवाद, आयुष्यभर माझ्या मनात ओरखड्यासारखा कोरला गेला. सकाळी पावणेसहा वाजता योगिताने मला घाईघाईने उठवलं आणि म्हणाली, “सागरला बरं नाहीय, चिन्मयला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे.” त्या क्षणी मी फारसा गंभीर झालो नाही. निवांतपणे तयारी करत होतो. तेव्हा योगिता रागाने ओरडली “लवकर निघ ना.” कदाचित तुझ्या आजाराची तीव्रता तिला आधीच जाणवली होती. पण मी तिचा राग मनावर न घेतला, नेहमीसारखाच निवांत निघालो. तुझ्या बिल्डिंगखाली जेव्हा मला चिन्मय भेटला आणि त्याने सांगितलं, “बाबांना आयसीयूमध्ये ऍडमिट केलं आहे.” तेव्हा माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. त्या क्षणापासून ते विरारच्या प्रकृती हॉस्पिटलपर्यंत, माझ्या डोळ्यांसमोर फक्त तू होतास. हसरा, दिलखुलास, जगण्यावर प्रेम करणारा सागर.

हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा प्राचीच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून मन क्षणभर सुन्न झालं. मनातली भीती अजून वाढली. डोळ्यासमोर तू शांतपणे, निश्चल पडलेला दिसलास. वाटलं की ज्याच्या आयुष्यात उत्साह, आवाज, अभिनय, आणि जगण्याची धडाडी आहे, तो सागर बेडवर श्वास मोजत असेल. पण खरं सांगू, त्याच क्षणी मनात एक विश्वासही होता की, तुला काही होणार नाही. कारण तुला अजून बरंच काही करायचं आहे.

अँजिओप्लास्टी करण्याआधी आपल्यात खूप हास्यविनोद झाले. त्या विनोदी गप्पांमध्येही एक लपलेली गंभीरता होती, अनामिक भीतीही दडलेली होती. त्यावेळी मला जाणवलं, आयुष्य हे खरं तर नियोजनात नाही, ते वर्तमानात आहे. ती सकाळ म्हणजे तुझ्या आणि माझ्याही आयुष्याची नवी सुरूवात होती.

सागर खरं सांगायचं तर, तुला डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांनी, तुझ्याबद्दलचा अनुभव मी तुला लिहुन पाठवणार होतो, पण योगिता म्हणाली, “नको ना. तो आता बरा आहे, कशाला आठवणी पुन्हा उघडतोयस?” तिचा मुद्दा बरोबर वाटला. कधी कधी जुन्या आठवणी पुन्हा उजेडात आणल्यास फक्त वेदना वाढतात. मी ते लिहिलेलं डिलीट केलं, जणू त्या क्षणाला गुप्त ठेवायचं ठरवलं. पण आज, जेव्हा तुझा लेख वाचला, तेव्हा मला पुन्हा हे लिहावसं वाटलं. कारण आयुष्यात काही क्षण इतके मूल्यवान असतात की, त्यांना शेवटी शब्दांत मांडणं गरजेचं असतं.

सागर त्या दिवसभरात तू अनुभवलेला प्रत्येक क्षण मी जवळून पाहिला होता. तुझ्या डोळ्यांत आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन जन्म घेत होता. तुझ्या लेखातील ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही ओळ किती जिवंत आहे, हे मी तिथेच अनुभवत होतो.

आज तू पुन्हा मंचावर आहेस, पुन्हा हसतोयस, पुन्हा लिहितोयस, पण त्या एका दिवशी, तू आम्हा सगळ्यांना शिकवलं की, आपलं अस्तित्व काही क्षणांचंच असतं, पण त्या क्षणांना आपण कसं जगतो, हेच खरं जीवन असतं.

Love You & God Bless You Mitra. ❤️
अथांग म्हणाले…
धन्यवाद शाम. आपण नक्कीच भेटू. तुझ्यासारखे कलाकार आपल्या कलेसाठी जे तळमळीने काम करत आहेत, त्याचं मला नेहमीच अप्रूप आणि कौतुक वाटत आला आहे. माझ्या लिखाणाने कोणाला असं मानसिक बळ मिळत असेल तर मी नक्कीच लिहितं राहण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच आज मी व्यवस्थित उभा आहे. लव यू
अथांग म्हणाले…
काय बोलू? आता तुझ्या लिखाणापुढे माझी लेखणी स्तब्ध झाली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनकथा - Connection

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा