हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा
3 ऑक्टोबर 2025 - मृत्यूच्या दरवाज्यावर धप्पा करून मी मागे वळलो होतो. खरं सांगू तर बरेच दिवसापासून स्वतःला एकाकी एकटा समजत होतो पण मरणाच्या दारातून प्रेमाचं विश्व अगदी सुस्पष्ट दिसू लागलं. ते दर्शन इतकं विलोभनीय आणि भावस्पर्शी होतं की मी त्यात गुंगून माझा हृदयरोग ही विसरून गेलो.
पहाटे हॉस्पिटल ला आयसीयू मध्ये दाखल झाल्यापासून माझी एनजीओप्लास्टी होईस्तोपर्यंत माझ्या हृदयाला धडधडत ठेवण्याचं काम माझ्या सहचारिणीच्या - प्राचीच्या शब्दांनी केलं होतं. भावनावेगात ती मला म्हणाली होती "काहीही कर. पण, मरू नकोस." ते शब्द माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये बाजीप्रभू देशपांडे सारखे गच्च पाय रोवून उभे होते. त्या शब्दांनीच मला बळ दिलं होतं. माझा मुलगा चिन्मय सतत I.C.U.च्या दरवाजातून मला भेटण्यासाठी डोकावत होता. तो जेव्हा मला भेटायला आला तेव्हा त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा अभिमान, अधीरता, व्याकुळता, प्रेम हे सगळं एकवटलेलं दिसत होतं. स्वतः तापाने फणफणलेला असतानाही मला भेटायला आलेल्या प्रशांत वारंगने लहान मुलासारखा जेव्हा माझा गालगुच्चा घेत, "घाबरवलस की आम्हाला!" असं म्हटलं, तेव्हा हसता हसता माझ्या डोळ्यात पाणी साचलं.
पहाटेपासून माझ्या बायकोला खंबीरपणे सोबत करणारा नावापुरता माझा मॅनेजर आणि खऱ्या अर्थाने मित्र - CP - चंद्रकांत पटेल. संपूर्ण हॉस्पिटलच, रुग्णांचं, माझं, सगळ्यांचं जगणं आपल्या विनोदी स्वभावाने त्या परिस्थितीतही खेळीमेळी करण्याचं सामर्थ्यशाली काम करणारा माझा नाट्यप्रेमी मित्र चार्ल्स गोम्स. पहाटे गरजेच्या वेळी माझा फोन लागला नाही, ह्या भावनेने कसनुशी झालेली प्रेमळ मिनाज. रात्रंदिवस सतत प्राचीची सोबत करत आम्हाला जेवू घालणारा माझा लाडका भाऊ शिवहरी. माझी एक झलक पाहायला आसुसलेले मकरंद, मोनाली आणि योगिता. मी हा हॉस्पिटलमध्ये I.CU. मध्ये आहे हे कळल्यावर रडकुंडीला आलेली प्राचीची भावनाशील मैत्रीण सविता. माझ्यासाठी दोन्ही वेळेला डब्बा घेऊन आलेली शितल. सगळी महत्वाची काम सोडून आलेले माझे जिवलग मित्र पुष्कराज, प्रणय, नितीन, विघ्नेश, निलय आणि शेखर जाधव. ज्यांना मी फारसा परिचित ही नाही असा, प्राचीच्या शाळेतील मला भेटायला आलेला स्टाफ. सतत फोनवरून माझ्या तब्येतीची चौकशी करणारे आणि प्राचीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले तिच्या शाळेचे ट्रस्टी मनोज शुक्ला. फळांचा द्रोणागिरी घेऊन आलेले माझ्या मुलाचे - चिन्मयचे मित्र. मला का कळवलं नाही म्हणून चिडलेला आणि त्याचवेळी कासावीस झालेला आमचा नाट्यप्रेमी मित्र जयेश नार्वेकर.
मला त्रास होऊ नये म्हणून फक्त डोळ्यांनी संवाद अधिक साधणारे माझे सासरे एकनाथ ठाकूर आणि मेव्हणा विवेक. प्राचीचे मामा-मामी की माझे असा संभ्रम पडावा असे नरेश आणि रजनी गावंड हे दांपत्य. स्वतःला बीपीचा आणि गुडघ्याचा त्रास असताना देखील अहोरात्र पाठीवरून मायेचा हात फिरवणारी सासू-कम-आई रेखा ठाकूर. मला डिस्चार्ज मिळाल्यावर माझ्या घरी धावत जाऊन माझी दृष्ट काढण्यासाठी तयारी करणाऱ्या प्राजक्ता वहिनी. डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी माझ्या शेजारी दिवस दिवस ठाण मांडून बसलेली ख्याती मेहता. माझ्यासाठी नवनवीन सूप करून पाठवणाऱ्या कल्पा वहिनी आणि मंजुषा. माझ्या आजाराबद्दल समजल्यावर रडवेली झालेली माझी बहीण वैदेही. पनवेल वरून लगोलग धावत आलेली माझी दुसरी बहिण वर्षा. माझी बडबडी वहिनी राखी आणि मोठा भाऊ कपिल.
आमचे मोहन सामंत सर आणि दीपा मॅडम, धुळे सर. माझ्यावर प्रेम करणारे ऑफिसचे वर्षानुवर्षाचे मित्र अजय, प्रशांत शिर्के, आशिष कुमार आणि प्रेमळ दादागिरी करणारी सीमा नायक. मैत्रीची गाठ पक्की असलेली माझी मैत्रीण स्मिता, आमच्या चहाच्या आणि जेवणाच्या ब्रेकमधली चांडाळ चौकडीतील पुष्पक आणि सायली. मला त्रास होऊ नये म्हणून व्हिडिओ कॉल वर संपर्क साधणारा व नंतर भेटायला आलेला जिवलग चिंतन. मी बरा आहे हे पाहून ज्याचा जीव भांड्यात पडला तो, नेहमीच्या मित्रत्वाच्या व्याख्येत न बसणारा - माझा पूर्वीचा मॅनेजर आणि कायमचा जिवलग जुगेश. सुट्टीच्या दिवशी दुपारी खास वेळ काढून आलेला भन्नाट बडबड्या कथाकार मित्र सागर हाटे. माझ्याशी तीन तास बोलत बसलेले आमच्या ऑफिसचे सिक्युरिटी कम जिवाभावाचे मित्र गणेश तोरसकर. काय आणि किती सांगू? माझ्यावर प्रेम करणारी जी माणसं माझ्या थेट संपर्कात होती त्यांची ही यादी. या व्यतिरिक्तही अनेक जण ज्यांना मी नंतर कळवलं किंवा अजून कळवलेलंही नाही, जे भेटले नाहीत आणि तरी माझी सतत चौकशी करत होते, अशी प्रेम करणारी माणसं अनेक आहेत.
क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणाचा…पण इथे तर प्रेमाचा इतका वर्षाव झाला की त्या प्रवाहात माझा हृदयरोग, मृत्यूची भीती, सारं सारं काही वाहून गेलं. त्या ईश्वराचे उपकार किती मानू ज्याने मला इतके भावुक आणि प्रेमळ मित्र-नातेवाईक दिले. आज त्यांच्या प्रेमामुळे मी इतका ठणठणीत आहे की, मला देखील खरं वाटत नाही की असं काही अरिष्ट माझ्या आयुष्यात घडून गेलं. हे प्रेम समजून घ्यायला मीच कमी पडलो कदाचित. हे मी अगोदरच समजून घेतले असते तर ती वेळच आली नसती. पण देर आये दुरुस्त आये. हृदयाच्या रक्तवाहिनीतून फक्त रक्ताचाच प्रवाह नव्हे तर भावनांचा प्रवाह ही मोकळेपणाने वाहू लागला.. हीच तर खरी प्रेमाची जादू आहे. माझ्या आसपास प्रेम करणाऱ्यांची एवढी गर्दी होती की, माझा मृत्यू कुठच्या पुढे दिसेनासा झाला. कदाचित, या प्रेमळ लोकांच्या पायदळी येऊन मेला असावा. तुम्हाला काय वाटतं?
- सागर रानडे
टिप्पण्या
Love You Mitra ❤️
आपल्याला फुल मॅरेथॉन करायची आहे😄