मॅराथॉन
आज घरात बसून तसा मला दिड आठवडा झाला. तसंही दैनंदिन जीवनात व्यायाम हा प्रकार सोडून बराच काळ झाल्यासारखं वाटतं होतं. पृथ्वी जशी तिच्या स्थिर अक्षाभोवती गतिमान असते, तसं आजच्या वर्तमानामध्ये स्थिर झालेल्या मेंदू भोवती भूतकाळाच्या धावत्या आठवणी रूंजी घालू लागल्या. भागे रे मन, कहीं लागे रे मन, चला जा ने किधर जानू ना... असं म्हणत, माझ्या मनाने चार वर्षांपूर्वी पुर्ण केलेली पहिली पहिली मॅरॅथॉन गाठली. मॅरेथॉन एक व्यायाम प्रकार, तो कसा एखाद्या ललित लेखाचा विषय होऊ शकतो? पण, माझ्यासाठी नक्कीच होऊ शकतो. आयुष्य आनंदाने भरून टाकणारी, नव्याने जगणं शिकवणारी कोणतीही गोष्ट माझ्या लिखाणाचा भाग होऊ शकते.
मॅरॅथॉन.... एक विलक्षण अनुभव. धावणे म्हणजे व्यायामाच्याही पलिकडे जाऊन एक वेगळी अनुभूती होती माझ्यासाठी. मॅरॅथॉनचा रोजचा सराव म्हणजे ऊर फोडणाऱ्या आयुष्याच्या शर्यतीत मला मिळालेला विसावा. ह्या सरावाने मला निसर्गाच्या अगदी जवळ आणले. मला निसर्गाचा भाग असल्याची जाणीव करून दिली. विविध रूपांनी ही मॅरेथॉन माझ्या आयुष्याला स्पर्शून गेली.
मॅरेथॉन म्हणजे गाण्याची मैफल.पहाटेची शांत नीरव वेळ, झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्याचा स्वर, एका लयीत पडणाऱ्या पावलांचा ताल अन् धपापणाऱ्या श्वासांचे सूर. गाणारा मी आणि एेकणारा निसर्ग. रोमरोमातून मिळणारी घर्मबिंदूंची दाद. रोज अशी आमची नवी मैफल जमायची, रंगायची. ह्या बैठकीला साथसंगत द्यायला सोबत असायचे पायाखालची वाट, पहाटेचा गारवा अन् अंतर्मुख करणारा अंधार. कधी कधी वाटतं ही मॅरेथॉन, हे धावणं म्हणजे काव्यच. ती चारोळी कधीच नसते, ती असते एक दीर्घ कविता, तीदेखील मुक्तछंदातली. पण, गंमत अशी की, ती जरी मुक्तछंदातली कविता असली तरी, दृढ निश्चय, श्वास आणि शरीर ह्यांच यमक मात्र जुळवावं लागतं.
मॅरेथॉन ने नुसतं माझं आरोग्यच सुधारलं नाही तर आयुष्य समृद्ध करणारी शिकवणही दिली. आनंदी आयुष्याचा कानमंत्र. आयुष्य ही शर्यत नाही. आयुष्य म्हणजे मॅरेथॉन. इथे दुसऱ्याशी स्पर्धाच नाही, स्पर्धा आहे ती कालच्या स्वतः ची आजच्या स्वतः बरोबर. कस लागतो तो स्वतःची गती ओळखण्यासाठी. तिची एकदा ओळख झाली की मग पुढला सगळा प्रवास अगदी हसत खेळत घडतो. ही गती एक ठहराव आहे. सामर्थ्य वाढवणारा, आपल्या गतीत, आपल्याच मस्तीत, तरीही तणाव रहित. आपल्याला कुणाच्या पुढे जायचे नाही की मागे रहायचे नाही. उद्दिष्ट एकच, ठरलेले अंतर खेळीमेळीने अव्वल आपल्या गतीने पुर्ण करणे. गंतव्य स्थान नव्हे तर प्रवास महत्त्वाचा. आणि गंमत म्हणजे हा प्रवास पुर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मेडल मिळते. Because, everyone is winner. आयुष्य असंच नसतं का? आणि समजा नसेल तर असायला हवं.
आता या जागतिक संकटामुळे आपण जे थांबलो आहोत, जो स्टँड स्टीलपणा आला आहे, तो खरतर एक ठहराव आहे. त्यात आपली गती ओळखा. अहो, प्रवास संपला नाही आहे. आज चार किलोमीटर (दिवस) मागे पडले सुध्दा. मग? धावणार ना? मी आणि अनेकजण आहेत तुमच्यासोबत आणि आपल्या सर्वांना जिंकायची आहे ही मॅरेथॉन. एक मेडल आपल्या प्रत्येकाची वाट पहात आहे.
- सागर रानडे
टिप्पण्या