धर्म


                    आज फेसबुक चाळत असताना प्रकर्षाने जाणवलं की, ह्या करोनोने फक्त माणसांनाच नव्हे, तर राजकारण, धर्म या (जीवनावश्यक) विषयांना पण सळो की पळो करून सोडले. इथे धर्म म्हणजे Religion बरं का. जगात निर्माण झालेली सगळी अराजकता, जनमानसात असलेला सगळा विद्वेष ह्याच कारण हाच धर्म (Religion),आज तो कुठेही नावाला दिसत नाही. 
               
                    आजच्या रविवारच्या सकाळी शांत पहुडलो होतो. लहानपणापासून पाहिलेल्या, वाचलेल्या, अनुभवलेल्या विचारांची मनात एकच गर्दी झाली आणि माझ्या लेखाचा विषय ठरला - धर्म, खरा धर्म. माझ्या मते Religion म्हणजे खरा धर्म नव्हेच. कदाचित Religion ला पर्यायी शब्द मिळाला नसेल तेव्हा... 'मराठा तितुका मेळवावा' ह्या चित्रपटामधील 'शूर आम्ही सरदार' ह्या गाण्यातील देव, देश अन् धर्मापायी या ओळीने, मला जाणीव करून दिली की देव व धर्म ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आचारविचार, भेदाभेद ह्या शब्दांप्रमाणेच 'देवधर्म' हा एक शब्द. मुळात वेगवेगळे असे हे भिन्न विषय कधी व कसे एकरूप झाले असतील हे कोडेच होते माझ्या समोर. कोणत्याही गोष्टीचा विज्ञानाधिष्ठित व विवेकशील प्रश्नांनी शोध घ्यावा हे दाभोळकरांचे म्हणणे मला पटले आणि त्याला अनुसरून, धर्म म्हणजे नक्की काय ह्याच्या मुळाशी माझ्या अल्पमतीने जाण्याचा मी प्रयत्न केला. जे कळले, उमगले ते तुमच्या समोर मांडतो आहे. मला समजलेला धर्म म्हणजे जीवन जगण्याचा योग्य व नैसर्गिक मार्ग किंवा रीत. माझ्या मते निसर्गालाच दुसरं नाव म्हणजे धर्म. 
          
                     लहानपणी माझ्या कानावर धर्म शब्द पडला तो स्वभावधर्म व शरीरधर्म ह्या शब्दांतून. कोणत्याही गोष्टीला मुळच्या संस्काराने व संवेदनांनी प्रतिक्रिया देण्याची नैसर्गिक वृत्ती म्हणजे स्वभाव धर्म. भोवतालाशी व अंतर्गत क्रियांशी समन्वय साधत नैसर्गिक नियमांचे पालन करत देहाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे शरीरधर्म. धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे हे नियम माणसागणिक, प्राण्यागणिक वेगवेगळे असू शकतात आणि तरीही कालातीत, न बदलणारे असतात. थोडक्यात, जे त्रिकालाबाधित सत्य तोच धर्म. कोणाच्याही सांगण्याने वा प्रभावाने जो बदलत नाही तोच खरा धर्म. अग्नीचा धर्म जळणे, जाळणे. वाऱ्याचा धर्म वाहणे, वाहून नेणे. पाण्याला कोणी उदक, कोणी नीर तर कोणी water म्हणतात. पण, तहान भागवणे हा त्याचा धर्म कालपरत्वे, स्थितीपरत्वे देखील कधीही बदलत नाही. माझी निश्चित खात्री आहे की, पाण्याने कृष्णाची, बुद्धाची, ख्रिस्ताची व मोहम्मदाचीही तहान भागवली असेलच. ह्या बाबत कोणाचेही दुमत नसेल. कारण, ते नैसर्गिक आहे. जिथे दुमत नसते, प्रश्नांना सरळसोट उत्तर असते, तिथे धर्म असतो. जिथे मतमतांतरे असतात, ओढून ताणून, भीतीने, धाकाने, मारून मुटकून आणलेले मार्ग असतात ते मानवनिर्मित पंथ असतात, धर्म नव्हे. 

                    धर्म मुळात मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मित असतो. सहजधर्म असतो. खरतर आपल्या संस्कृती मध्ये म्हणूनच धर्माला एक असे नाव नाही. शरीरधर्म, स्वभाव धर्म, शेजार धर्म, मानवता धर्म हेच खरे धर्म. 
ह्या आत्ताच्या संकटाने आपली पाटी खरंच कोरी केली आहे असं समजूया अन् नव्या जगात Religion ला विसरून खऱ्या धर्माचे पालन करूया. तो कुणाला नव्याने शिकवायची गरज नाही. त्याला आपण फक्त स्थितप्रज्ञतेने निरखायचं आहे, आत्मसात करायचं आहे. कारण, तो निसर्गतः सनातन काळापासून आपल्या आसपास आणि आपल्या आत पाय रोवून घट्ट उभा आहे. न बदलता. अगदी स्टँड स्टील. 

- सागर रानडे

टिप्पण्या

Sanghshree Gaikwad म्हणाले…
भारतीय समाजव्यवस्थेतील 'धर्म' आणि 'Religion' यांची प्रमाणित व्याख्या केली आहे. Keep it up.
Chetan saindane म्हणाले…
खूपच आवडलं हा लेख मला...
निनावी म्हणाले…
Khup aavadla ha lekh...kammal🙌
निनावी म्हणाले…
Best..one of my Favorite Blog..🙌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनकथा - Connection

हृदय कथा: पराधीन आहे जगती

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा