जीवनातला क्ष/ x - देव
मला जर कोणी विचारलं की देव खरंच आहे का? तर मी हसून सांगतो, " नाही. देव अस्तित्वात नाही, हे सत्य आहे. पण, मी मात्र देवाला मानतो." काय बुचकळ्यात पडलात ना? सांगतो, सगळं सविस्तर सांगतो.
गोष्ट तशी जुनी आहे, पाच सहा वर्षापूर्वीची असेल कदाचित. मालवण देऊळवाड्यातल्या रामेश्वर मंदिरासमोरच्या आमच्या घरात दुपारच्या जेवणानंतर, मी झोपाळ्यावर हळुवार झोके घेत बसलो होतो. मध्यान्हीची वेळ. शांत, निशब्द, स्टँड स्टील. रामेश्वराच्या देवळाकडे पहाता पहाता अनेक विचार मनात दाटून आले होते. देव खरंच अस्तित्वात आहे का? असेल तर तो मुर्त आहे की अमुर्त? का नुसतीच एक अनुभूती?
तसं पाहिलं तर माझा जन्म देव भोळ्या कुटूंबातील. माझं सगळं बालपण भजन, किर्तन, पुराणकथा, अनुभव कथा श्रवण, संत चरित्र वाचन ह्यात गेलं. हे सगळं मनोभावे करता करता देखील मनात अनेक प्रश्न निर्माण झाले व समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अनुत्तरितच राहिले. त्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना कधी मी निरीश्वरवादाकडे वळलो ते माझे मलाच कळले नाही. तरी मनापासून कुठे तरी देव असावा आणि तो मला भेटावा अशी इच्छा होतीच. पण, कल्पना व वास्तव ह्यांचा मेळ बसत नव्हता. अन् ह्याच विचारांच्या गोंधळात मी झोके घेत होतो. इतक्यात साठी पार केलेल्या निर्मलाताई तिथे आल्या. निर्मलाताई अस्सल कोकणातल्या मातीतल्या. प्रेमळ, दिलदार. माझ्या माहितीनुसार, त्या अविवाहितच होत्या. लहानपणी अनेकदा त्यांच्या कुंभारमाठच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार मी घेतला होता. त्यांच्या घरात भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला होता. जेव्हा केव्हा त्या घरी आल्या तेव्हा कधी त्या रिकाम्या हाताने आलेल्या मलातरी आठवत नाहीत. आम्हा मुलांसाठी आंबा, फणस किंवा तत्सम फळे, मुलींना गजरा वा चाफ्याची फुले आणीत असत. पण पुढे दैवगती फिरली. त्यांच्या सख्या भावांनीच त्यांना टाकले. वयपरत्वे आणि मानसिक ताणामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊन, त्या भ्रमिष्टासारख्या मालवणभर फिरू लागल्या. रात्रीच्यावेळी कुंभारमाठच्या, आता पडिक झालेल्या, छप्पर नसलेल्या घरी आश्रयाला जाऊ लागल्या.
आणि आज अचानक भर दुपारी त्या आमच्या घरी आल्या. त्यांचा ह्या घराशी जुना स्नेह. त्यांची स्थिती पाहून मला फार वाईट वाटले. मी त्यांना बसायला सांगत विचारले, "काही खाणार का?" "नाही. नको. आत्ताच भरड नाक्यावर एकाने पेज दिली." त्या उत्तरल्या. त्या नको नको म्हणत असतानाही मी त्यांना चहा आणून दिला. मनात आलं, कसला देव आणि काय. ज्या स्त्री ने आयुष्य भर देवाची पूजा केली. जिच्या दारातून कोणी रिकाम्या हाताने गेला नाही, तिला आज अशी वणवण करावी लागते आहे. कसला रामेश्वर? तो अस्तित्वात नाही ह्याची मला आता खात्री पटली. तितक्यात निर्मलाताईंच्या आवाजाने माझ्या विचारात खंड पडला. त्या उद्गारल्या, " तुमच्या सारखी माणसं माझ्या वर भरभरून प्रेम करतात, त्यामुळे ह्या अश्या अवस्थेतही मला दोन वेळेच्या खाण्याची कमतरता नाही. " जणू त्यांनी माझे विचार वाचले. चहाचा घोट घेत त्या म्हणाल्या, " रामेश्वराची कृपा आहे सगळी. सागर, ऐक सांगू? देव आहे बरं ह्या जगात. " त्या असं म्हणाल्या मात्र समोरच सगळं धुसर झालं. पाण्याच्या दाट पडद्याआड निर्मलाताई दिसेनाश्या झाल्या. मनातल्या एका शंकेचे निरसन झालं.
गणित हे एक विज्ञानाधिष्ठित शास्त्र आहे. पण, बरेचदा ते सोडवण्यासाठी आपण एक काल्पनिक संख्या क्ष किंवा X मानतो, जी हवं ते योग्य उत्तर शोधण्यासाठी खूपदा गरजेची असते. देव, ईश्वर हा ही असाच मानवी जीवनातील क्ष आहे. जगणं सुसह्य करण्यासाठी तो बऱ्याचदा लागतोच.
म्हणून मला आता जर कोणी विचारलं की देव खरंच आहे का? तर मी हसून सांगतो, " नाही. देव अस्तित्वात नाही, हे सत्य आहे. पण, मी मात्र देवाला मानतो."
- सागर रानडे
टिप्पण्या
तुझ्या लिखाणात आणि अभिनयात खूप प्रगती व्हावी हिच शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐🙏