मनकथा - कंटाळावे परी, उत्साहरुपे उरावे.
दुपारची शांत वेळ. जेवून मी माझ्या बेडरूममध्ये ढीम्म बसलो होतो. काहीही कारण नसताना दोन आठवडे होऊन गेले तरी लेखाचा एकही शब्द मी लिहिला नव्हता. एवढेच नव्हे तर माझी प्रात्यक्षिक परीक्षा (Practical exam) शनिवारी आठ तारखेला आहे; हे दीड महिना आधीपासून ठाऊक असूनही मी पुस्तकाला स्पर्श केला नव्हता. या विनाकारण आलेल्या असाहाय्यतेने मी थकून गेलो होतो. कंटाळलो होतो. "या कंटाळ्याचा पण कंटाळा आलाय.." असं म्हणत मी हतबलतेने डोळे मिटले.
अचानक कसल्याशा आवाजाने माझी तंद्री भंगली. माझ्यासमोर खुर्चीवर एक इसम बसला होता. त्याचा चेहरा निस्तेज होता. किंचित औदासिन्याकडे झुकणारी कळा त्याच्या तोंडभर पसरली होती. एक तणाव त्याच्या व्यक्तिमत्त्वातून झिरपत होता. आणि त्याचे डोळे.... ते बर्फासारखे थंड होते. मी त्याला निरखून पाहिलं मात्र, तो अगदी माझ्यासारखा दिसत होता. Ditto. माझंच प्रतिबिंब. पण काहीसं उपेक्षिले गेलेले. मी त्याला धीर करून विचारलं. "कोण आहेस तू?" तो उदासवाणे हसत म्हणाला. "अरे! मी तुझंच रूप. माझं नाव कंटाळा."
मी क्षणभर गोंधळलो. पण, माझा गोंधळ चेहऱ्यावर दाखवू न देता मी चढ्या आवाजात म्हटलं. "अरे वा रे वा ! भले शाब्बास! तू जर माझंच रूप, तर मग मला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी, तुला नकोशा का वाटतात?" तसा तो आपली बर्फाळ नजर माझ्या डोळ्यात खोल रोखत म्हणाला, " तूच तुला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींना दूर सारून, जिथे लौकिकाची शर्यत आहे, स्वार्थाची रस्सीखेच आहे, जबाबदाऱ्यांचे ओझं आहे, त्यात गुंतलास. अर्थात त्यातलं काही गरजेचं आहे आणि काही अटळही आहे. पण, त्याचा अतिरेक तितकाच भावनिक आणि मानसिकरित्या गुदमरून टाकणारा असतो. अशा अतिरेकी रुटीनमध्ये तू स्वतःला झोकून दिलस आणि उरलेल्या वेळेत विविध साहित्यात, नाट्यकलेत रस असणाऱ्या, विविध कलांचाच नव्हे तर एकांताचा अन निसर्गाचाही मनमुराद आनंद लुटणाऱ्या स्वतःतल्या खळाळत्या ऊर्जेला म्हणजे मला, समाज माध्यमांवरील निरर्थक मनोरंजनाच्या भोवऱ्यात खोल बुडवून टाकलस; इतकं, की मी बर्फासारखा गोठलो. आत्ता जेव्हा तू डोळे मिटून आत निरखून पाहिलस.. तेव्हा कुठे मी तुला दिसलो." इतकं बोलून तो गप्प झाला.
मी क्षणभर त्याच्या त्या बर्फाळ डोळ्यात पाहिलं मात्र, मला त्याला काय हवय ते अनायास कळलं आणि मी त्याला गच्च मिठी मारली. स्वतःने स्वतःला जाणीवपूर्वक दिलेली, जादू की झप्पी. त्याला मिठीत घेताच मला जाणवलं की त्याच्या डोळ्यातल बर्फ वितळून, त्यात पाणी तरारले आहे आणि त्याच्या थंड पडलेल्या देहात धुगधुगी निर्माण झाली आहे.
अचानक माझे डोळे खाडकन उघडले. दुपार सरून संध्याकाळचे विविध रंग आजूबाजूला उतरू लागले होते. आत्ता जे काही पाहिलं, अनुभवलं, ते खरं की खोटं? तेच कळत नव्हतं. माझ्या नकळतच मी अभ्यासाचं पुस्तक हाती घेतलं आणि काय आश्चर्य! माझं मन अभ्यासात पूर्णपणे रमून गेलं. किती वेळ गेला कोणास ठाऊक? पण मी जेव्हा अचानक वर पाहिलं, तेव्हा तो मला पुन्हा कोपऱ्यात उभा असलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर आता मिश्किल स्मितहास्य पसरलं होतं. खिडकीतून झिरपणाऱ्या उन्हाच्या तिरक्या कवडशांसारखं. मी त्याच्याकडे रोखून बघितलं. तो आता जरा वेगळा दिसत होता - तरतरीत. महत्त्वाचे म्हणजे त्याचे डोळे पाणीदार दिसत होते. मी त्याच्याकडे पाहत चटकन उद्गारलो, "तूच ना रे तो, कंटाळा?" त्यावर त्याने हसत नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला." तो तर केव्हाच विरघळला. माझं नाव ....... माझं नाव - उत्साह."
- सागर रानडे

टिप्पण्या
Prachi
आयुष्य हे आनंदमयी असायला हवे. आयुष्य जगण्याचा कंटाळा नाही आला पाहिजे. उलट कंटाळा दूर करण्यासाठी आयुष्य जगले पाहिजे, मनापासून जगण्याची मुभा आपल्याच हातात आहे, तरी मग का असे गळून जातो आपण ..?
पाहिला गेलं तर, आयुष्य हे एक प्रकारचं खूप मोठं पुस्तक आहे. मग त्या पुस्तकात चांगले विचार लिहायचे का वाईट हे आपल्याच हातात असते.
आयुष्य हे आनंदमयी असायला हवे. आयुष्य जगण्याचा कंटाळा नाही आला पाहिजे. उलट कंटाळा दूर करण्यासाठी आयुष्य जगले पाहिजे, मनापासून जगण्याची मुभा आपल्याच हातात आहे, तरी मग का असे गळून जातो आपण ..?
पाहिला गेलं तर, आयुष्य हे एक प्रकारचं खूप मोठं पुस्तक आहे. मग त्या पुस्तकात चांगले विचार लिहायचे का वाईट हे आपल्याच हातात असते.
मनिषा मयेकर 🙏🏻
मनिषा मयेकर
त्याची "बर्फ़ाळ नजर" अतिशय सुंदर उपमा.
बऱ्याच लोकांना हेच माहित नसतं की त्यांना नक्की काय आवडतं, ते उमागणं ही आनंदाची पहिली पायरी.
बाकी तुझा हा उपक्रम छान आहे. पुढल्या वेळेस तुझ्या स्वप्नात "messenger" बनून कतरीना येईल अशी सदिच्छा 😀
सौरभ जोशी (सिंगापूर)