द्वंद्व - एकांत एकटा



एकटं असणं सुंदर आहे.
गर्दीहून ते मोहक आहे.
एकटं असणं दुःख नव्हे तर.
आनंदाचं द्योतक आहे.
 
एकटं असणं म्हणजे.. 
पूर्णत्वाची मनीषा आहे.
एकांताची नशा आहे.
जीवनाची जिगीषा आहे.
मौनाची ती भाषा आहे. 

एकटं असणं म्हणजे.. 
एक प्रकारची शांती आहे.
दुःखाची ती भ्रांती आहे.
मनाची विश्रांती आहे 
एकटं असण्यातच क्रांती आहे.  

वाईट नसतं एकटं असणं...
वाईट असतें जाणीव.
अज्ञानात सुख मान्य पण आता...
कुठून आणू ती नेणीव? 

जोडल्या मी सर्व तारा, 
पण मी कोणाची सितार नाही.
छेडतो तारा नात्यांच्या तरी,
पूर्वीचा त्यात झंकार नाही.  

सगळ्यांना मी आवडतो खरा
त्यास माझा इन्कार नाही.
दुःख फक्त ह्याचच की, आता 
मजविषयी कुणा तक्रार नाही. 

खरं सांगू, 
समोर पाहत आता मला त्या 
शिखरावरती पोहोचायचंय.
त्याचवेळी अजूनही स्वतःला 
मित्रांच्या शिरगणतीत मोजायचंय. 

पण आता कुणीही मला 
त्यांच्यामधे मोजत नाही.
कशावरूनही, कधीही कुणीच
पूर्वीसारखं टोचत नाही. 

इतका बोथट झालो आताशा की, 
मी कुणाला बोचत नाही.
इतकंच कशाला..आठवणीतही 
आठवण म्हणून मी आठवत नाही.  

शून्यता खुणावते मजला, 
पण एकाचा अंत मज गवसत नाही.
एकटेपण स्वीकारले मी, कारण 
मी आता स्वतःला फसवत नाही.  

- सागर रानडे

टिप्पण्या

Prachi म्हणाले…
खूप सुंदर कविता सागर .आणि इतर कवितांपेक्षा वेगळी कविता आहे. सगळ्याबरोबर असून सुद्धा एकटं असणं ही कल्पनाच त्रासदायक आहे . कल्पना आहे तोपर्यंत ठीक आहे. बाकी सगळं तुला व्यवस्थित माहित आहे ..सो लिहित रहा..🙂 All the very best.
हेमंत मराठे म्हणाले…
सद्यःस्थितीत सर्वांची जवळपास हीच अवस्था झाली आहे. खूप छान वर्णन केले आहेस.
अथांग म्हणाले…
धन्यवाद. प्राचू. खरंच तू आहेस त्यामुळे मी एकटा नाही आहे. हे माझं भाग्यच आहे.
अथांग म्हणाले…
खुप धन्यवाद. मूलतः एकटेपण हे व्यक्ती सापेक्ष नसतं तर ते समान असतं सर्वांसाठी. वेगवेगळ्या अनुभवातून वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे ते प्रक्षेपित होतं एवढेच. आणि ते थोड्याफार प्रमाणात का होईना मला मांडता आलं आणि तुमच्यासारख्या पर्यंत ते पोहोचलं ह्यातच मला आनंद आहे
निनावी म्हणाले…
अप्रतिम कविता सागर.
खूप रिलेट करते ही कविता.
अथांग म्हणाले…
धन्यवाद. आपलं नाव सांगाल तर बरं होईल.
निनावी म्हणाले…

इतका बोथट झालो आताशा की,
मी कुणाला बोचत नाही

Waaah waaaah kya baat hai
निनावी म्हणाले…
खूप छान,असच छान छान लिहित रहा आम्ही वाचत राहतो.
Ashu म्हणाले…
It's different and very good thaughts. Asach lihit raha.
निनावी म्हणाले…
सुंदर कविता.
---- विलास पागार.
Shivahari Ranade म्हणाले…
शून्यता खुणावते मजला,
पण एकाचा अंत मज गवसत नाही.
एकटेपण स्वीकारले मी, कारण
मी आता स्वतःला फसवत नाही.

- सागर रानडे

हे फारच आवडलंय मला … कमाल लिहिली आहेस .नेहमीसारखच अप्रतिम लिखाण आणि वैचारिक उच्च पातळी पण स्वतः मधे डोकावणारी व्यक्ती एकटी नसतेच कारण त्याच्या सोबत असते सर्वात खरी आणि सर्वात जवळची व्यक्ती ती म्हणजे ती व्यक्ती स्वतःच…..❤️
निनावी म्हणाले…
अमित कापसे
अथांग म्हणाले…
धन्यवाद. नक्की प्रयत्न करेन. आपला नाव?
अथांग म्हणाले…
नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद आशु.
अथांग म्हणाले…
हो रे प्रसाद. सगळ्यात असतं हे द्वंद्व. फक्त इथे मी ते मांडलय.
एडवर्ड सोज म्हणाले…
सागर अप्रतिम कविता. फक्त एक सजेशन आहे..

समोर पाहत आता मला त्या
शिखरापर्यंत पोहोचायचं आहे..

इथे वाचक अडकू शकतो, "त्या" म्हणजे नक्की कोणत्या.. इथे वाचकांची कवितेशी असलेली अनुभूती तुटते. प्रत्येकाचं शिखर / स्वप्न वेगवेगळं असतं त्यामुळे 'त्या' ऐवजी "माझ्या" शब्द अधिक संयुक्तिक ठरेल.

जरी जोडल्या मी तारा.. आणि त्यापुढील 6 ओळी हा एक स्वतंत्र 'गझलेचा शेर' वाटतो.

तू गझल ट्राय करायला हरकत नाही.
Monali म्हणाले…
खरंच खूप च सुदंर कविता आहे वाचता वाचता एकटेपणाची भावना समोर येते. सगळ्यात असूनही एकटे, शब्दात छान ओवले आहे
निनावी म्हणाले…
खूप छान सागर दादा ,एक वेगळी कविता..... कदाचित आपत्तीच इष्टापत्ती मध्ये रूपांतर करण यालाच म्हणतात...
Akshada म्हणाले…
Khupach chaan kavita ,Sagar.It takes a lot of inner work to come to the realization and acceptance of being okay to be alone amidst people.Kadhi kadhi aplya aju bajula lok asun pan aplyala ekta vatta karan quality of connection matters too.Reminds me of a research i read-A person can feel alone despite having multiple connections,as quality of connection trumps the number.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हृदय कथा: पराधीन आहे जगती

मनकथा - Connection

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा