हृदय कथा: फिरूनी नवा जन्मेन मी

 


3 ऑक्टोबर २०२५. खरच एक अविस्मरणीय दिवस. अतिशय आगळावेगळा दिवस. हृदयविकाराच्या झटक्याने भूत आणि भविष्याच्या हिंदोळ्यावरून झटकन मला वर्तमानाच्या जमिनीवर अलगद आणून ठेवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. मला वाटलं होतं की, अशा क्षणी मी हादरून जाईन. पण, एक अनामिक, अनोळखी शांती मनात विलसत होती. 


For a change, मनात कसलेच विचार नव्हते. आजूबाजूची माणसं, स्वतःच्या शरीर, हृदय  हे सर्व मी निर्वीकल्प व कुठल्याही प्रतिमेच्या आहारी न जाता अनुभवत होतो. परमशांती, मुक्ती, मोक्ष जे काय म्हणतात ते हेच असेल का? मनात विचार आला, ‘ज्यासाठी केला अट्टाहास’ ते सर्व काहीही न करता इथे वर्तमानात उपस्थित होते..पूर्वीपासूनच. उपस्थित नव्हतो तो मी. आणि आज अचानक या एका झटक्यासारखी सर्व एकदम स्वच्छ दिसू लागले. ब्रह्मानंद स्वामींचं, ‘क्या पानी मे, मलमल न्हावे | मनके मैल उतार पिया रे ||’ किंवा, ‘अपने को भूल तनमे, बाहिर फिरे गवारा.’ याचा अर्थ अचानक असा दृष्टोत्पत्तीस आला. भल्या भल्यांना तप करून जे उमगत नाही, ते या जन्ममरणाच्या हिंदोळ्यामध्ये पटकन मनात प्रकाशित झालं. It is so simple to be happy, but it is so difficult to be simple.’ पण मला ते आज सोप्या होऊन सोपे वाटत होतं. पण, त्यासाठी हृदयाला मोठा झटका द्यावा लागला होता, हे मात्र खरं. 


आयुष्य, प्रेम, निसर्ग, विश्वातील आणि माझ्या शरीरातील कणाकणांविषयी मला कृतज्ञता आणि स्वतःच्या भाग्य विषयी आनंद वाटून भावविवशतेने माझ्या डोळ्यात पाणी तरारले.आजवर चंगळवावादाच्या मागे लागून शरीराचे, हृदयाचे हाल केले. पण, तरीदेखील या हृदयाने निस्वार्थपणे अतिशय जीवघेण्या लढाईत आपले सर्वस्व अर्पित माझा प्राण, माझा जीवनानुभव वाचवला. गीतेतला निष्काम कर्मयोग जो मला कळला होता; पण वळला नाही, तो माझ्या हृदयाने आपल्या आचरणातून दाखवून दिला. प्रेमात हृदयाला  इतकं महत्त्व आहे, ते आता मला कळलं. मेंदू किंवा बुद्धी तर्कसंगत विचारात  गुंतलेले असताना हृदय मात्र निरागसपणे प्रेमपूर्वक आपलं कर्तव्य बजावत. म्हणून, निसर्गाने जीवनरस शरीरभर, मेंदूसकट सर्व इंद्रियांना पोहोचवण्याचे कार्य बहुदा हृदयाला  दिल असावं. आता मला माझ्या आचरणातून, आहारातून, विचारातून हृदयाच्या ऋणाची परतफेड करायची आहे. त्याची सुरुवातही मी केली आहे. 


अपरिमित इच्छा, आकांक्षा, वासना आणि मीपणा यांच्या विसर्जनातच आनंद आहे. जीवन आहे. शरीरकष्ट आणि निस्वार्थपणे प्रेम देण्यातच जीवनाचं सार्थक आहे, हे उमगलं आणि हृदयाला चिकटलेला मीपणाचा आणि वासनेचा मळ (विकार) स्वच्छ व्हायला सुरुवात झाली. तशा कृतीही माझ्याकडून आपसूक होऊ लागल्या आहेत. जुनी तुटलेली नाती पुन्हा नव्याने मी जोडू लागलो आहे. जी  नाती आधीच टिकून होती; त्यांच्या गाठी अजून घट्ट करू लागलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, स्वतःच्या शरीराशी, स्वतःशी पुन्हा एकदा तारा जुळवू लागलो आहे. जीवनाची विणा झंकारायला तयार होत आहे. सगळं अलगद होत आहे. 


जीवनातली कोणतीही गोष्ट उगाच घडत नाही,  हे ह्या हृदयविकाराच्या झटक्याने मला पटवून दिलं. आयुष्यात प्रथमच मला स्वत्वाची, आनंदाची, माझ्या जीवनाच्या अमूल्यपणाची जाणीव  झाली. अन, माझं मन  गाऊ लागलं. 


लहरेन मी, बहरेन मी | 
शिशिरातून उगवेन मी |
                                                                एकाच ह्या जन्मी जणू | फिरुनी नवा जन्मेन मी ||


- सागर रानडे

टिप्पण्या

चार्ल्स थॉमस गोम्स म्हणाले…
सागर, तू जे अनुभवलंस, ते शब्दांत मांडलंस. पण हा लेख नाहीय, तर आत्म्याशी झालेला नाजूक संवाद आहे. शब्दांच्या ओळींमध्ये जे भावविश्व उमटलं आहे, त्याला मनापासून प्रणाम.

Love You & God Bless You Mitra. ❤️
निनावी म्हणाले…
शब्दातून भावविश्व कस साकरायच हे तुला इतकं छान जमत. तुझे प्रत्येक लेख वाचते. कारण मला चांगल्या वाचनाचं वेड आहे. हे वेड मला जपता यावं म्हणून असाच लिहीत रहा. आणि हे लिहिता यावं म्हणून तुला चांगलं आरोग्य लाभो🙏
अथांग म्हणाले…
धन्यवाद तृप्ती. प्रयत्न करेन.
Akshada म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Akshada म्हणाले…
Ha adhyatmik angle khupach sundar lihila ahes,Sagar! Loved a lot of things you had to say here.Especially he tuza realization ki he hriday(kharatar saglech avyav!) na thambta, na kantalta is trying to keep you alive.Apan aplya aharani ani vicharani kitihi zulum karunhi apli niswarthapane seva kartay ani hyatun yenari krutadnyata to the creator and returning the favor with a pledge to take care of the creator within you. This is transformational!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनकथा - Connection

हृदय कथा: पराधीन आहे जगती

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा