स्टँड स्टील
आज लाॅकडाऊनचा पहिला दिवस. खाटीक बाहेर सुरा परजत असताना खुराड्यातल्या कोंबडीची कशी अवस्था (अस्वस्थता) होत असेल, अगदी तसंच काहीसं वाटायला लागलं होतं. छातीत दुखतंय की काय? घशात कफ दाटला आहे की काय? अश्या नको त्या संवेदना उगाचच ठळकपणे जाणवू लागल्या. गेल्या पंधरा वीस दिवसांत अनेकांना मिळवलेले हात, खाल्लेले उष्टे पदार्थ, हात न धुता मिटक्या मारत हादडलेले रस्त्यावरील खाद्यपदार्थ सगळे एकजात डोळ्यासमोर नाचू लागले. विचारांचा डोक्यात एकच हलकल्लोळ माजला. संपलं का जगणं? अरे, किती गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. आपली बकेट लिस्ट आपल्याच बकोटीला मारून मध्यंतरालाच एक्झिट घ्यायची की काय? या आयुष्याचं ध्येय काय? जीवनाचा अर्थ काय? हा सगळा शोध कधी घ्यायचा? सगळंच संपणार घरात बसल्या बसल्या? हे सतत हॅपनिंग असलेले आयुष्य एकदम, अचानक स्टँड स्टील झालं.
कसं कोणास ठाऊक, हळूहळू हे कपातलं वादळ शमलं आणि मन पहाटेच्या तलावासारखं स्थिर, नितळ झालं. कित्येक वर्षात न एेकलेली चिमण्यांची चिवचिव ऐकली. स्वच्छ सुर्यप्रकाश पाहिला. झाडांचा हिरवाकंच रंग डोळ्यांना आणि मनाला गारवा देऊन गेला. भोवताल एच् डी क्वालिटी सारखा स्वच्छ दिसू लागला. शांततेचा सूर मनाची तार छेडून गेला अन् अचानक ही स्थिरता मनाला भावू लागली. सगळंच खूप सुंदर आणि प्रसन्न वाटू लागलं. क्षणार्धात जाणवलं की उगा आयुष्याचा अर्थ शोधत वणवण फिरत होतो. ज्या गोष्टी आयुष्यभर निरर्थक वाटत आल्या, खरंतर त्याच आनंददायी व अर्थपुर्ण आहेत, हे जाणवलं. हे जाणवलं मात्र, सगळंच बदलून गेलं. आजचं जेवण जरा जास्तच गोड, रूचकर लागलं. मुलाला मारलेल्या मिठीतलं आसुसलेपण जाणवलंं. ध्यानातला अवीट आनंद उपभोगला. ही गोडी, हे आसुसलेपण, हा आनंद अगदी परिपूर्ण होता.
ज्या साठी केला होता अट्टाहास, ते इथेच होतं. शांत, अविचल. फक्त बदल एवढाच होता की, आता मीही त्याचं अवस्थेला पोहोचलो होतो आणि ते जे काही आहे, त्याची न् माझी आकस्मित, अजाणतेपणी भेट झाली होती. माझी खात्री पटली की, ह्या अश्या निरर्थक भेटीतूनच पहिल्यांदा सप्तसूर निपजले असतील. श्रुती स्मृती, उपनिषदे स्फुरली असतील. अध्यात्मात ज्याला ब्रम्हस्थिती म्हणत असतील, ती देखील हिच असेल कदाचित, कुणास ठाऊक? जगणं हेच, आयुष्याचा अर्थ हाच. जीवनाचं ध्येयही हेच. हाच एकमेव क्षण,आताचा. स्टँड स्टील. अर्थपूर्ण असा निरर्थक असलेपणाचा.
बऱ्याच जणांना हे सगळं निरर्थकच वाटेल. वाटेल हा डोक्यावर पडला आहे. पण, who cares. मला माझ्यापुरतं आयुष्य गवसलं आहे, ह्या निरर्थकतेत. आता हे आयुष्य १०० वर्षाचं असो, २१ दिवसांचं किंवा ह्या क्षणापुरतं, पर्वा नाही. मी जगलो आहे, जगतोय परिपूर्णपणे..... स्टँड स्टील.
- सागर रानडे
टिप्पण्या