मन की बात
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मन की बात हे वाक्य सतत कानावर पडू लागलं. पण आजकाल आपण खरंच मन की बात (मनाविषयी..मनातलं नव्हे.) करतो का? आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण प्रचंड प्रगती केली आहे. तिची गती इतकी आहे की, वाऱ्यालाही मागे टाकणाऱ्या मनाची ही फार दमछाक होते. कदाचित म्हणूनच वाऱ्याला मनोज म्हणत असतील. अशावेळी, माझ्या मनात आलं की, चलो! आज मन की बात करते है. काय गंमत आहे ना हे देखील मनातच आलं.
मन आहे म्हणून आपण मानव; हे वाक्य लहानपणापासून घोकून पाठ झाल आहे. पण, खरंतर हे मन इतकं अचंबित करणारे, मती कुंठीत करणारे आहे, याची जाणीव अगदीच सरधोपट झाली आहे. या मनाचं दिव्यत्व, अफाटपण, अथांगपण, इतक्या प्रगतीनंतरही मापता आलेलं नाही, ही केवढी मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का?
आजपर्यंत आपण मनाचा शोध अगदी अविरत घेत आहोत. कधी कवितेतून, कधी अध्यात्मातून, कधी चिंतनातून, कधी अभंगातून, कधी चित्रपटातून तर कधी शास्त्रोक्त वैज्ञानिक परीक्षणातून हा शोध सतत सुरूच आहे. आपल्याला मन आहे, हे समजण्यापूर्वी मला ते रामदासांच्या मनाच्या श्लोकातून प्रथम भेटले. त्यांनी 'मना सज्जना' असं म्हणून मनाला चूचकारून योग्य मार्गाकडे वळवावे, असे सांगितले आणि त्याचवेळी 'मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर.' असं म्हणून, बहिणाबाईंनी त्या मनाची तुलना पिकात घुसलेल्या ढोरांशी केली. हे मन नक्की सज्जन की एक ढोर हा प्रश्न मनात तसाच रुंजी घालत असताना, 'दिस चार झाले मन, पाखरू होऊन.' ह्या गाण्याने स्वप्नांची भेट घेण्यासाठी उंच भरारी मारणाऱ्या मनाच्या वेगळ्या स्वरूपाचे दर्शन घडवले. अशाप्रकारे हे मन विविध रंगात, विविध ढंगात, विविध रूपात, मला भेटतच राहिलं. कधी दगडापेक्षा कठोर. तर कधी लोण्याहूनही मऊ. कधी सरोवरासारखं शांत, नितळ. तर कधी वादळात घोंगावणाऱ्या वाऱ्यासारखं अस्थिर, विध्वंसक.
मग मला मनाचा लळाच लागला. एक वेगळंच अतूट असं नात असल्याची जाणीव झाली. बाह्य जगातून आलेल्या ज्ञानाची कास सोडून, आतल्या अनामिक ओढीची आस मला लागली. आता आतलं अनुभवणं सुरू झालं आणि हे अनुभवणं देखील कोणाचं? मनाचं. कोणी अनुभवाव? मनानं. किती अभूतपूर्व गोष्ट आहे नाही का ही? स्वतःचाच अनुभव स्वतःच घेणारी मनासारखी अशी कोणती दुसरी गोष्ट ह्या विश्वात असू शकेल? कल्पनातीत.
ह्या मनाच्या आतल्या ओढीने एक वेगळीच उत्सुकता एक वेगळीच जिज्ञासा माझ्यात निर्माण केली आणि मनाचे एक एक पापुद्रे मला उलगडून पाहता येऊ लागले. सतत आपल्याच मनासारखं व्हावं, असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण, त्याचवेळी 'मन चिंती ते वैरी न चिंती.' म्हणजे, इतक्या वाईट गोष्टी आपण चिंतितो, याची जाणीवही मला झाली. मग आपल्या मनासारखं होणं योग्य की अयोग्य हाच संभ्रम मला पडला. मनाने सतत सुखच अनुभवाव, दुःखाचा लवलेशही नसावा, असं सतत वाटू लागलं आणि त्याचवेळी जर दुःखच नसेल तर सुखाची जाणीव तरी होईल का? हा प्रश्न मला पडला. मनाचा संबंध शरीराशी (स्वतःच्या शारीरिक प्रतिक्रियांशी) आला की भावना निर्माण होतात. आता त्या भावनांचा आस्वाद घ्यावा की त्या भावना ताब्यात ठेवाव्यात हाच निरुत्तर करणारा प्रश्न माझा पाठलाग करू लागला.
प्रश्न निर्माण केले माझ्या मनाने आणि त्या उत्तरांचा शोधही घ्यायचा स्वतःच्याच मनाने. किती गोड स्थिती आहे, पण गोंधळात टाकणारी परिस्थिती. पुढे काय करावे ते सुचेना अशी. अचानक एक दिवस, माझ्या मदतीला तुकोबा धावून आले. त्यांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातील शेवटच्या कडव्याने बोल माझ्या कानावर पडले.....
तुका म्हणे येथे मनाशी संवाद|
आपुलाची वाद आपणाशी||
आणि मी योग्य मार्गावर असल्याची खात्री झाली आणि हळूहळू सर्व चित्र स्पष्ट होऊ लागले. कबीरांनी मनाला चादरीची उपमा दिली आहे. आपण ती डागाळतो. दुःखाचे, वेदनेचे डाग आपल्याला नको असतात. पण, काही सुखाचे, काही अपेक्षांचे, काही हव्यासाचे, काही राग द्वेषाचे, असे सगळे डाग आपल्या मनाच्या चादरीवर पाडतो आणि 'दाग अच्छे होते है' असं म्हणत, ती चादर तशीच न धुता उराशी कवटाळून ठेवतो आणि त्या चादरीलाच घाणेरडी चादर ठरवून टाकतो. हे सगळं नीट सविस्तर कळलं. पण मग यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न तसाच तळाशी पडून राहिला. बराच काळ....
मग रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतःच्या मनाच्या सागरात बुडी मारत राहिलो. हळूहळू अनुभवाने मनसमुद्राचं वरवरच दिसणार रौद्ररूप बाजूला पडले. खोल आत असणार त्या समुद्राचे नितळपण कळून येऊ लागलं. त्याच्या आतले समाधानाचे, आनंदाचे प्रवाह माझ्याशी झटू लागले, अनाहूतपणे. आत्तापर्यंतच आयुष्य उगाचच किनाऱ्यावर वर उफाळणाऱ्या लाटांची झगडत, खेळत फुकट घालवलं. याची जाणीव झाली आणि अगदी नकळत माझ्यातला मीपणा सागरमय झाला.
आता त्याच माझ्या मनाकडे तटस्थपणे पाहता पाहता मला आयुष्याचं सार/तत्त्वज्ञान आकळलं. तेच जर रूपकात सांगायचं झालं तर मी म्हणेन की हा देह एखाद्या चित्रपटगृहासारखा आहे आणि मन आहे त्या चित्रपटगृहातल्या पडद्यासारख. ते स्वच्छ होतच, असतंच आणि राहणारच. त्याच्यावर बऱ्या वाईट घटनांचे, सुखाचे, दुःखाचे, वैविध्यपूर्ण भावनांचे चित्र उमटतच राहतात आणि त्यातूनच आयुष्याचा चित्रपट अथपासून इति पर्यंत आपल्याला पाहता येतो, अगदी तटस्थपणे. हा तटस्थपणा म्हणजे त्या पडद्याला, आपण शुभ्र पडदा आहोत आणि त्याच्यावर उमटणारी चित्र आपल्याला चिकटलेली नाहीत याची झालेली जाणीव. आयुष्याचा चित्रपट एकदा का असा तटस्थपणे पाहता येऊ लागला की, तो आपल्याला एन्जॉय करता येतो. हे अगदी पूर्णपणे उमगलं.
आणि आता खरी माझ्या मन की बात सांगू का? आता मी किनई अतिशय उत्सुकतेने माझ्या या स्वमालकीच्या चित्रपटगृहात बसून, पुढे येऊ घातलेल्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. मग तो चित्रपट हॅप्पी एंडिंग वाला असो, की ट्रॅजिक. गंभीर असो की, विनोदी. तो तितक्याच आसुसून पाहण्याची ओढ मला आता लागलेली आहे. आहे किनई मजा? कोणाला सांगू नका बरंका.
- सागर रानडे

टिप्पण्या
मन से मन की बात….
याच्यापेक्षा आयुष्यात महत्त्वाच काही नसेलच कदाचित , प्रत्येकाने मनावर मनापासून अभ्यास करावा तरच कदाचित मनरुपी पडद्यावर आयुष्याचा चित्रपट जसा असेल तसा पाहता येण शक्य होईल कोणत्याही तक्रारीशिवाय …
--- विलास पागार.
अतिशय सुंदर चिंतन सागर.
मन म्हणजे शरीराचा नक्की कुठला अवयव..?
नाही सांगता येत. येणारच नाही. काहींच्या मते मन म्हणजे मेंदूत उठणारे विचारतरंग तर काहींच्या मते मन म्हणजे मेंदू.
समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीनुरूप मेंदूत स्त्रवणाऱ्या लहरींचे प्रारूप म्हणजे विचार. त्या विचारांना कितीतरी कंगोरे असतात. एकातून दुसऱ्यात दुसऱ्यातून अजून एका वेगळ्याच विचारात शिरावे लागते.. मन अगाथ अथांग आहे. कितीही आत शिरलो तरी तळ सापडत नाही.
तटस्थपणे मनाचा शोध घेणे क्लिष्ट प्रक्रिया आहे पण ती प्रत्येकानं त्या प्रक्रियेत भाग घेणे स्वतः साठी, समाजासाठी गरजेचे आहे.
लिहीत रहा. शुभेच्छा!
Great going 👍
सद्गुरुनाथ महाराज की जय🙏
अजून येवोत हीच सदिच्छा - शाम राऊत