भाषा: शब्दांच्या पलीकडली

         
  
          लहानपणापासून मला भाषेचं एक वेगळंच आकर्षण होतं. त्यात हल्ली अधून मधून डोके वर काढणाऱ्या शुद्ध व अशुद्ध भाषा या वादामुळे पुन्हा एकदा माझं लक्ष भाषेकडे वेधलं गेलं. कसं कुणास ठाऊक पण या वादात 'भेटणं' आणि 'मिळणं' या दोन शब्दांच्या वापराला अनन्यसाधारण महत्त्व आलं आणि याच विषयावर अथर्व सुदामेची एक विनोदी, भन्नाट रीळ पाहिली, जिने मला एक वेगळाच दृष्टिकोन दिला... शब्दांकडे, भाषेकडे बघण्याचा. अर्थात, शब्द कुठे आणि कसे वापरायचे, चालवायचे, याचे व्याकरणाचे काही नियम असतात आणि ते पाळलेही पाहिजेत. पण, मला तर वाटतं शब्द चालतात ते त्यांच्या मागच्या भावनांमुळे. व्याकरण तशी अधली मधली गोष्ट. व्याकरणाच्या अल्याड आपण, आपले शब्द आणि पल्याड भावोत्कट भाषा
         अतिशय सामान्य वाटणारे शब्द खूप गहन असतात, असं मला वाटतं. आता भेटणं आणि मिळणं या दोन साध्याच शब्दांचं उदाहरण घ्या ना. मला वाटतं, भेटणं या शब्दातून भेटणाऱ्या दोघांचं, मग ती वस्तू असो वा सजीव, त्यांचे अस्तित्व, त्यांचे स्वत्व जपलं जातं. ही हातात हात घालून चालण्याची क्रिया आहे. त्यात हात सोडण्याचे स्वातंत्र्यही आहे, आणि साथ सुटण्याची भीतीही. तू आणि मी मिळून आपण होणं. दो बदन एक जान असंच काहीसं, पण स्वतःचं अस्तित्व टिकवून... पण मिळणं या शब्दातच मात्र काहीतरी प्रयत्नपूर्वक प्राप्त करण्याचा मालकी हक्क दडलेला दिसतो. त्यात काहीसं ममत्वही आहे. इथे एकाच समर्पण, तर एकाच स्वामित्व. माणसे भेटतात तर, जिवलग मिळतात. संकटांची भेट होते पण, त्यातून अनुभव मिळतो. भेटणं क्षणिक असतं आणि मिळणं दीर्घकालीन. मित्र भेटतातही आणि मिळतातही. ते भेटले की मिळाले, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. 
        ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमृताची उपमा दिली. अमृत म्हणजे जे मृत नाही; सतत जिवंत आहे, चिरंतर आहे. आत्म्यासारखं अमर आहे. भाषा म्हणजे निव्वळ शब्द नव्हे; शब्दरूपी देहात वसत असलेला भावात्मा म्हणजे भाषा (between the lines). भाषा म्हणजे शब्दांच्या पलीकडली ऊर्जा. या दिव्यतेला शब्दात, व्याकरणात किंवा कुठल्याही वादात अडकवणं चूकच. त्यापेक्षा शब्दांचा वापर करून व्याकरणाच्या पल्याड अथांग पसरलेल्या भाषेचा गोडवा जपत तिच्यात आकंठ बुडी मारणं केव्हाही श्रेयस्कर आणि आनंददायक नाही का?

- सागर रानडे

टिप्पण्या

निनावी म्हणाले…
उत्कृष्ट आणि दर्जेदार लिखाण. खूप शुभेच्छा 🙏🥰
मिळावे परी भेटिरुपी उरावे 🌹

सुंदर 👍
Makarand म्हणाले…
Khup chaan lekh. Bhasha hi madhyam aahe eka manaache dusarya manaaparyant pohochanyachi
निनावी म्हणाले…
Kup chan lekh. Keep it up!
निनावी म्हणाले…
खूप छान सर...
- म्हात्रे
निनावी म्हणाले…
Khupach chaan, Sagar..Keep it up
निनावी म्हणाले…
सागर खूप छान लिहिलेस.
निनावी म्हणाले…
खूप छान मांडलं आहेस
निनावी म्हणाले…
खूप छान आणि सहज लिहितोस सागर..असंच लिहीत रहा
Charles Thomas Gomes म्हणाले…
वाहहहहह... सुंदर
Ashu म्हणाले…
Very very good Sagar. Keep up the good work 👍
निनावी म्हणाले…
अल्पाक्षर रमणीय भाषेतून मांडलेला सहज सुंदर लेख
Kush म्हणाले…
खुप छान. बऱ्याचदा शब्दशहा अर्थ काढला तर चुकीचा अर्थ काढून गैरसमज ही होतो.भावना किंवा हेतू समजणं जास्त महत्वाच.
निनावी म्हणाले…
खुप छान 👍🏻
निनावी म्हणाले…
मस्त लिहिले आहेस. तुझे भाषेवर प्रभुत्व आहेच. छान मांडणी आहे.
हेमंत मराठे म्हणाले…
थोडक्यात छान मुद्दा मांडला आहे. भाषा मुळात संवादासाठी असली तरी ती समजून बोलणं खूपच महत्वाचे आहे. अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो
निनावी म्हणाले…
‌‌‌‌‌उत्कृष्ट लेखन..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनकथा - Connection

हृदय कथा: पराधीन आहे जगती

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा