उगाच थोडसं काव्यात्मक
सकाळ
प्रत्येक सकाळ उत्साहाची, सजलेली एक मैफल असते.
अशा प्रत्येक सकाळीला, शांत नीरवपहाटेची बैठक असते.
पहिल्या किरणात सूर्याच्या, चैतन्य प्रकाश दरवळतो.
प्रत्येक पाना फुलांमध्ये हळूच, पहाटदव विरघळतो.
आभाळ
तू बसशील जेव्हा फांदीवर, तुझ्यासोबत बसणारच आहे.
तू जाशील सोडून तेव्हा,तुझ्यावर मी रुसणारच आहे.
तरी, पिंजरा नाही हं, माझं प्रेम. आभाळ आहे,असणारच आहे.
तू उडशील तेव्हा ते दिसेल निरभ्र, तू जाशील दूर तेव्हा ते बरसणारच आहे.
मागे वळून पाहताना
वर्षा मागून वर्षे पटकन झटकन निघून जातात.
आठवणी अधूनमधून, क्रूरपणे छळून जातात.
बाल्य व तारुण्य दोघे हा हा म्हणता पळून जातात.
आणि अचानक एक दिवस....
आपल्याच मुलां मधून आपल्याकडे, मिश्किल पणे हसून पाहतात.
क्षणभंगुर
मी का अजून तरुण नाही, एकदा स्वतःशीच मी बोललो होतो.
वार्धक्याच्या स्पर्शापूर्वी, नखशिखांत मी गळलो होतो.
गंध होता मातीचा पण, फुलास वाटे मी फुललो होतो.
तसाच कधी मी क्षणभंगुर कदाचित, त्या तारुण्याला सुचलो होतो.
निराशा
काय होते मनी आताशा, मज काही कळत नाही.
दुःख वा विरह मनीचा, न जाणो का सुटत नाही.
हलते काही, ढळते काही, आत जरासे तुटते काही,
आठवाचे ओरखडे हे, न जाणो आताशा दुखत नाही.
तो आनंद हृदयी आता, काही केल्या ठरत नाही.
भरून येतो उर तरीपण, आत काही उरत नाही.
पाणओल्या पापणीची, ओलसरता ही सरत नाही.
नयनातही अश्रू आताशा, दाटतो पण झरत नाही.
वाटते हा देह सुटावा, पण लक्तरेही फिटत नाही.
जगत आलो दूरवर परंतु, नाळ मृत्यूची तुटत नाही.
रंगते रागदारी यशाची , आर्तता सुरांची दिसत नाही.
किंचाळलो कैकदा अंतरी, तरीपण शब्द बाहेरी फुटत नाही.
- सागर रानडे
टिप्पण्या
Khoop chhaan.
मला आभाळ ही कविता फार आवडली .लिहत रहा.All the very best 😊👍